Thursday, 20 February 2020

वादळ निष्ठेचे .....

समाजशील प्राणी असला तरी माणूस हा एक विचारी व बुद्धिशाली जीव आहे. सद्बुद्धी असलेला विचारी प्राणी म्हणजेच प्राण तत्वाचे अस्तित्व…. “तत्व” ….. जगण्याचे स्वीकृत बंधन. सामाजीकरण हे तत्वाधारित असते असे एका पुस्तकात वाचले होते. तत्वातूनच तयार होतो उद्देश, उद्दिष्टाचा मार्ग आणि रचना. तत्व विचारांना अधिष्ठान देतात, अधिष्ठान वैचारिक बांधिलकी निर्माण करतात. ही वैचारिक बांधिलकी सकारात्मक किंवा नकारात्मक अशी काहीही नसते. ती ध्येयासक्त असते, ती सामाजिक, वैयक्तिक किंवा आर्थिकही असू शकते. बांधिलकी जेव्हा समजून उमजून ध्येय निश्चित करते तेंव्हा ती कोंदण निर्माण करते आणि मग सुरु होतो मनोव्यापार. निर्णय द्वंद्व, मानांतर्गत निर्णय प्रक्रिया, योग्य अयोग्य ह्याचे स्वतःलाच विवेचन. आणि निर्णय घेणे होते कठीण. माणसाला नेमकं कोणत्या बाजूने न्याय्य हे लक्षातच येत नाही.

असं सगळ्यांबरोबरच होत असं नाही. काही माणसे कोणत्याच बंधनात अडकत नाहीत. त्यांचे बंधन फक्त एकच ‘मी आणि माझा प्रयत्न’ मग समाज असो, व्यक्ती असो, कार्यालयीन काम असो, ज्ञानमार्ग असो, सृजनशीलता असो किंवा पैसा व सांपत्तिक धोरण असो यात ‘मी आणि माझा प्रयत्न’ इतकेच तत्व उराशी बाळगणारी माणस कधीही विचारांच्या किंवा निष्ठेच्या वादळात अडकत नाहीत. खरतर हीच माणसे जगाच अर्थकारण आणि विकासाचे समाजकारण चालवितात, कारण वादळात सापडलेले बाहेर आले तरच काहीतरी निर्णय घेऊन सकारात्मक भूमिका मांडू शकतील पण त्याची वारंवारता तुलनेने कमीच आहे. उलट या वैचारिक द्वंद्वाचा फार विचार न करणारी मंडळी मात्र नक्की काहीतरी ठामपणे मांडतात. प्रतल बदलणारे विचार हे वादळ संपल्याशिवाय समाजात निर्माणच होत नाहीत. बदल घडविणारी किंवा आडवाटेनं विचार करणारी मंडळी या द्वंद्वाला भेदून कर्तृत्व सिध्द करतात आणि त्यांचा हाच उत्क्रांतीचा प्रयत्न प्रगतीची दिशा ठरवितो. खरेतर राजकीय, सामाजिक दृष्टीने या लोकांना मुख्य किंवा आदराचे असे स्थान नसते. समाजसुधारक, मार्गदर्शक, किंवा समाज धुरीनांमध्ये यांची गणनाही होत नसते. असे लोक आनंदाने आपले काम हाच परमेश्वर मानून अजाणतेपणी कर्मयोग सांभाळत असतात. अशी संख्या जास्त असते किमान ५० ते ५५ टक्के. विचारांचे द्वंद्व झुगारून देण्यामुळे कदाचित यांची मतदानाप्रती किंवा सामाजिक जाणीवेप्रती उदासीनता दिसून येते. पण हेच खरे काम करणारे लोक असतात. सामाजीक, वैयक्तिक आणि राष्ट्रीय कार्यही हीच मंडळी करतात. हाच खरा समाज आहे हे लवकर लक्षात येणारे राजकारणी धुरीण होतात.

जे लोक समाजाच्या समोर येतात मत व्यक्त करतात कायम कुठे न कुठे आपली बाजू मांडायचा प्रयत्न करतात आणि वैचारिक स्पष्टता असल्याचे भासवून विचारवंत असल्याचा आव आणतात पण हे द्वंद्व मनाच्या कोपऱ्यात कायमच चालू राहते. किमान ४५ ते ५० टक्के लोक तरी या अश्या द्वंद्वाचे बळी आहेत. कित्तेक जण याच भोवर्यात अडकून राहतात काहीजण एक कोणतातरी मार्ग पकडून जाण्याचा प्रयत्न करतात पण मुळातच भांबावलेली मनं प्रयत्नपूर्वक योगदान देण्यास असमर्थ ठरतात. म्हणजे काम करताना मित्र महत्वाचा की कार्यालय, विरोध करावा की नाही, बायको बरोबर की आई, बाजू नेमकी कोणाची घ्यावी, माझा मित्र माझ्या बाजूने का नाही, मर्यादा कशाला म्हणतात, असे करावे की नाही, आपण मदत करावी की नाही, माझी जात महत्वाची की कर्तृत्व, माझा आधीचा वरिष्ठ चांगला होता की आत्ताचा वाईट, भाषणातील किंवा तात्विक चर्चेतील वाक्य आणि वागणुकीतील तत्व वेगवेळी असतात का, विरोध नेमका कशासाठी कोणाचा आणि कायमच का, माणूस महत्वाचा की संघटन, पैसा महत्वाचा की देश, मीच एकट्याने करून काय होणार आहे असे अनेक प्रश्न आपल्यालाच अप्रत्यक्षपणे कायम विचारतात की बाबा तुझ्या निष्ठा नेमक्या कोणाशी पैसे, कुटुंब, मित्र, समाज, जात, कार्यालय की राष्ट्र. या प्रश्नांच्या जाळ्यात अडकलेले लोक आपले काम योग्य पद्धतीने करण्यास असमर्थ ठरतात. आपल्याला स्पष्ट नसलेल्या कल्पना वारंवार लोकांना सांगून स्पष्ट करून घेण्याचा प्रयत्न करतात. यात सकारात्मक, नकारात्मक, समाजाभिमुख, व्यक्तिवाद, समाजवाद, भांडवलशाही असे अनेक विचार करणारे लोक असतात. यातील काही करे विचारवंत किंवा संपूर्ण ज्ञानी असतातही पण त्यांना ओळखणे खूप कठीण. खरे काम करणारे लोक अश्यांना बरोबर ओळखतात व त्यांचा मार्ग पत्करतात.

या द्वंद्वामध्ये प्रतिनिधीपदी राजकारणी, लेखक, समाजसेवक, वृत्तपत्र, media, असे अनेक मात्तबर मंडळी असतात. आता यांची निष्ठा कुठे हे प्रसंगात्मक शोधावे लागेल. पण त्यांच्या मागे उभी असणारी जनता मात्र कायम द्वंद्वाला सामोरी जाणारी आणि निर्णय क्षमता नसलेली. आता हीच जनता राजकारण, मतदान, समाजकारण या गोष्टींशी सख्य दाखविते आणि समोर येते. म्हणजे माझे काम मी काय करतोय या पेक्षा पंतप्रधानांनी कसे काम करावे याचे विवेचन करणे महत्वाचे असते. सामाजीक प्रगतीसाठी भांडवलशाही आवश्यक आहे असे मत असणारे survival of the fittest हे चुकीचे असून survival of the weakest चा सिद्धांत मांडतात. दुसर्याबाजूला समाजसुधारणा होण्यासाठी साम्यवाद महत्वाचा मानणारी मंडळी जातीच्या आधारावरील संघटनांना खतपाणी घालताना दिसतात. सगळेच अस्पष्ट आणि वैचारिक वादळात सापडणारी मंडळी निष्ठेच्या वादळात हरवून जातात आणि आपले कर्तृत्व, सृजनशीलता, आणि क्रयशक्ती हरवून बसतात.

निष्ठेचे हे वादळ सामाजिक प्रगतीला बाधक ठरते आणि लोकशाही अपेक्षित फळ देऊ शकत नाही.

आशिष मुकुंद पुराणिक

९४२२५१०७९३/९०२८८८६१५८

ashishmpuranik@gmail.com

No comments:

Post a Comment